

Kavita's Kaleidoscope: Thoughtful Prose, poetry and more...
प्रस्तावना
'दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे', श्री रामदास महाराजांनी म्हटल्याप्रमाणे माझं लिखाण गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. हे सगळंच 'स्वान्तसुखाय' लिखाण आहे. काही लेख मोजक्या नातेवाईकांना, मित्र-मंडळींना आणि गुरु समान सौ. विद्यामावशी पडवळ ह्यांना वाचायला दिले होते. त्यातल्या काही मंडळींनी आणि मावशींनी प्रोत्साहन देऊन तू चांगलं लिहू शकतेस असच लिहीत जा असा सल्ला दिल्यामुळे लिहिणं सुरु आहे.
लहानपणापासून आई-दादांनी आम्हा तिघी बहिणींना वर्तमानपात्र वाचनाची सवय लावली होती ....अजून आठवतं की पेपर कसा वाचायचा हे पण शिकवलं ... आधी मुखपृष्ठ आणि ठळक बातम्या चाळून मग शेवटचं खेळाचं पान चाळायचं, मग परत पेपर सुलट करून एक-एक पान उलटून बातम्या, जाहिराती, आवडती सदरं आणि मग अग्रलेख वाचन आणि पुरवणी वाचन असा क्रम होता. मला आठवतं मी माधव गडकरी, शुभदा चौकर, मोनिका गजेंद्रगडकर, राणी दुर्वे, सोनाली कुलकर्णी, आनंद नाडकर्णी, गिरीश कुबेर, जयंत साळगांवकर, मंगला गोडबोले, अरुण साधू, दिलीप प्रभावळकर आणि असेच कीतीतरी लोकसत्ता लेखक वाचत मोठी झाले आहे. ह्या सर्व लेखकांनी नक्कीच खूप छान भाषेचे संस्कार माझ्यावर केले आहेत. गिरगांव मध्ये सगळं बालपण-शिक्षण झाल्यामुळे आणि आई-वडिलांना नाटक, व्याख्यान, कीर्तन, प्रवचन, समाजसेवा ह्या सगळ्यांची आवड असल्यामुळे माझ्यामध्ये लहानपणी स्पंजसारखं जे काही झिरपलं आहे ते शब्दात मांडता यावं आणि स्वतःचे विचार व्यक्त करण्याची शैली तयार झाली आहे का ते अजमावावं म्हणून केलेला हा प्रयत्न...
आज साईट publish करण्याचं धाडस करते आहे. लिहिण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपली भाषा शुद्ध स्वरूपात लिहिली, बोलली पाहिजे म्हणजे आपणच भाषा संवर्धनाला हातभार लावला पाहिजे. ज्या संस्कारांवर आपण वाढलो ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं, आपला परिसर, शाळा, दैनंदिन सवयी आपल्या मनावर किती दूरगामी परिणाम करतं ते परत एकदा स्वतः अनुभवणं, ह्या सवयी आपल्या निर्णयक्षमतेवर किती प्रभाव करतात ते अजमावणं आणि निखळ लेखन-वाचनानंद मिळावा म्हणून लिहिणं. स्वतःची साईट तयार करण्याचा उद्देश म्हणजे लेखांचं संकलन विविध वर्गवारीनुसार करून एकाच संकेत स्थळी कायमस्वरूपी टिकावं, कधीही वाटेल तेंव्हा वाचायला मिळावं आणि जसजसं लिहीन तसतसं नवीन भर घालणं सोपं असावं.
'कलायडोस्कोप' हे नाव मला विशेष आवडलं कारण धनश्री ताई लेले सांगतात तसं - ज्ञानोबा 'दृष्टीचा डोळा' म्हणतात, 'डोळ्याची दृष्टी' न म्हणता ....तसं आपली प्रत्येकाची विशिष्ठ दृष्टी आपापल्या अनुभवांमधून तयार झालेली असते आणि त्या दृष्टीने आपण जगाकडे पाहतो.
© कविता सराफ
१८ ऑगस्ट २०२६