आई-दादा, गिरगांव आणि नाटकप्रेम

AAI ANI MI

7/29/20261 min read

person holding white and blue ceramic mug

आई-दादा, गिरगांव आणि नाटकप्रेम

मी गिरगांवकर असल्याने आणि घरातच नाटकात काम केलेले आई-दादा असल्यामुळे लहानपणापासून मीही खूप नाटकप्रेमी आहे. गिरगांवच्या मातीतच इतकं नाट्यप्रेम आहे की सगळ्या हरहुन्नरी बालगोपाळ, तरुण, मध्यवयीन किंवा वयस्कर (खरंतर age no bar ) लोकांनी साहित्य संघाच्या रंगमंचावर किमान एक तरी सादरीकरण केलं आहे.....हे म्हणजे गोऱ्यांनी लॉर्ड्सवर एकदा तरी खेळलं असलं पाहिजे तसं आहे...

आई-दादांनी 'खडाष्टक' ह्या नाटकात मुख्य भूमिका सादर केल्या होत्या आणि मी त्याच्या सुरस रम्य कथा माझ्या मोठ्या बहिणींकडून आणि चाळीतल्या विविध लोकांकडून ऐकल्या आहेत. मी कदाचित जन्मलेही नव्हते तेव्हा हे नाटक आमच्या चाळीच्या गणेशोत्सवात चाळीतल्याच लोकांनी बसवलं होतं. गणेशोत्सवात नाटक सादर करायचं म्हणजे त्याचा आराखडा, दिग्दर्शकाची निवड, कलाकारांची निवड आणि सवड, सेट-नेपथ्य तुटपुंज्या जागेत कसं उभारता येईल ह्याची चर्चा साधारण ३-४ महिने आधी व्हायची. ५०-६०% आकार आला ह्या गोष्टींना की २ महिने तरी नाटकाची तालीम झाली पाहिजे असं बघून आधी नाटकाचा रीतसर मुहूर्त व्हायचा. मग तालिमींसाठी जागेची शोधाशोध सुरु व्हायची ...ह्या नाटकाच्या खूप तालिमी आमच्या घरी झालेल्या आहेत.....पहिले १५ दिवस त्या-त्या रोलमधल्या लोकांनी फक्त नाटक-वाचन-संवाद असं बसूनच करायचं. सगळ्यांना थोडा तरी भूमिकेचा सूर सापडला की साधारण तिसऱ्या आठवड्यात उभं राहून ....नेपथ्य imagine करून तालिमी, एक-एक अंक पुढे नेत. ह्या तालिमींनंतर शनिवार-रविवारी आमच्या घरी चहा-भजी-गप्पांचा अड्डा जमायचा. नाटकासाठी १ महिना राहिला असताना नाटकाचं poster तयार करायचं काम चाळीतलेच कलाकार करायचे आणि आजूबाजूच्या सगळ्या चाळी आणि वाडीमध्ये लावून यायचे.....आजूबाजूच्या चाळीतली लोक पण नाटक बघायला उत्साहाने यायची. नाटक ८ दिवसांवर आलं की रंगीत तालीम.....आणि गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी नाटकाचा प्रयोग अगदी व्यायसायिक नाटकाचा होतो तसाच गणपती आणि रंगदेवतेला अभिवादन करून सुरु व्हायचा. नाटकासाठी 'गणपती' कलाकारांना समोरच, पण प्रेक्षकांच्या मागे दिसेल अशा तऱ्हेने stage असायचं.....नाटक संपता संपता रात्रीचे १:३०-२ वाजले असायचे. मग त्या दिवशी सगळ्यांनाच मस्त भेळ, पाव भाजी, मिसळ किंवा भजी अशी पार्टी असायची. चाळीतलेच सगळे जण पदार्थ तयार करायचे आणि सगळ्यांनी मिळून खायचे. तेव्हा बाहेरून कुणाला बोलावून contract द्यायचं आणि करून घ्यायचं अशी प्रथा सुरु झाली नव्हती. नाटकाचं planning ते actual performance हे दिवस एका वेगळ्याच ऊर्जेने भारलेले असायचे. मीही हे सगळं अनुभवलं आहे जेव्हा मी मोठी होऊन चाळीच्या नाटकांत काम करायला लागले तेंव्हा.

खडाष्टक मध्ये किंवा अजून दुसऱ्या कुठल्या तरी नाटकात ......'घंटा गेली पळे गेली ताशा वाजे झणाणा आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना' असं काहीतरी वाक्य होतं आई किंवा दादांना आणि ते नेहेमी वापरलं जायचं आमच्याकडे, आम्हा मुलींना देवादिकांचं करण्याची गोडी लागण्यासाठी....अजूनही एक लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे 'विचार कितीही चांगला असला तरी त्याला पंख नसतात, अविचार मात्र आसमंतात भरारी मारत असतो'. मला वाटतं ते मधुसूदन कालेलकरांच्या कुठल्यातरी नाटकातलं होतं ....आजोबांचं लाडकं वाक्य 'आयुष्य मेणबत्ती सारखं जगावं...स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश द्यावा', नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकरांची स्वगतं, त्यांची 'चिमणे.....' अशी हाक, 'घेई छंद ..मकरंद ...', 'सुरत पिया की..', 'नाही मी बोलत नाथा ..', 'कर हा करी धरीला ..', 'हे सूरांनो चंद्र व्हा...', 'काटा रुते कुणाला', 'गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी..' ह्या गाण्यांवर रंगलेल्या मैफिली अशा नाटकाशी निगडीत कितीतरी गोष्टी आमच्या रोजच्या जगण्याचा भाग होता.....

लहानपणी म्हणजे १ ली ते ६ वी मी दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप बालनाट्य बघितली आहेत. त्यातली काही काही मला अगदी जशीच्या तशी आठवतात - दुर्गा झाली गौरीं, अलिबाबा आणि चाळीस चोर, सिंड्रेला, हिमगौरी आणि सात बुटके, भूतबंगला, राजा शिवाजी, आम्ही हरलोय पृथ्वी जिंकलीये, अलबत्या गलबत्या, सिंदबादची सफर, निम्मा शिम्मा राक्षस, परी आणि राक्षस (beauty and the beast)अशी कितीतरी. आई मुंबईला लग्न होऊन आल्यानंतर पूर्णवेळ गृहिणी होती त्यामुळे ती मला नाटकाला घेऊन जायचं ठरलं की आजूबाजूला माझ्या मित्र-मैत्रिणींच्या आई-बाबाना पण विचारायची आणि त्यांची पण तिकीट काढून आणायची....आणि मग अनेकदा आम्हा ८-१० जणांना घेऊन जाणं, परत घरी आणणं आणि मधल्या वेळेत आमच्यासाठी मस्त खाऊची arrangement करणं हे सगळं केलं आहे. घरी केलेला चिवडा, cream biscuits, extra-strong च्या गोळ्या, पन्हं thermos मध्ये, असा प्रत्येकासाठी वेगवेगळा pack केलेला खाऊ आई मध्यंतरामध्ये द्यायची ...

साधारण सहावी किंवा सातवीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मला आईने राजा-राणी बढेंच्या नाट्य शिबिराला घातलं होतं ....बहुतेक १५ दिवसांचं होतं ते शिबीर ...त्यातून मला दोन पायांवर समभार देऊन उभं राहायचं, प्रेक्षकांकडे पाठ शक्यतो करायची नाही, आपले संवाद खणखणीत आवाजात म्हणायचे आणि दुसऱ्याला/सहकलाकाराला cue कसा द्यायचा तो विसरला तर ....प्रॉम्पटिंगची गरज पडायला नको पण पडलीच तर prompter कडे प्रेक्षकांच्या लक्षात न येऊ देता कसं लक्ष द्यायचं अशा कितीतरी गोष्टी शिकले. ह्या शिबिराची सांगता म्हणून आम्हा सगळ्यांना साहित्य संघामध्ये अ.ना. भालेराव नाट्यगृहाच्या रंगमंचावर आमची कला सादर करण्याची संधी मिळाली आणि आम्ही सगळ्यांनी आपापल्या wishlist मधली एक गोष्ट पूर्ण केली. आपली inhibitions ह्या अनुभवामुळे थोडीतरी गळून पडली आहेत असं त्या इतक्या छोट्या वयातही मला जाणवलं होतं .

पुढे दहावी नंतर आणि कॉलेज मध्ये गेल्यानंतरही आम्ही सगळे जण छान छान नाटकांना जायचो ....आई दादांनी भक्ती बर्वे आणि सतीश दुभाषी ह्यांचं फुलराणी बघितलं होतं आणि आम्ही परत नंतर बघितलं तेव्हा ते त्या दोघांची सर कोणत्याच संचाला नाही असं म्हणायचे. काही निवडक संगीत नाटकं - शारदा, रुक्मिणी स्वयंवर, मानापमान, मत्स्यगंधा, ययाति आणि देवयानी, कट्यार काळजात घुसली बघितल्याचं आठवतं आहे. त्यानंतर तीन अंकी किंवा दोन अंकी काचेचा चन्द्र, तरुण तुर्क म्हातारे अर्क, मोरूची मावशी, टूरटूर, ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, व्यक्ती आणि वल्ली, वाऱ्यावरची वरात, रमले मी, दीपस्तंभ, छावा, ऑल द बेस्ट, एका लग्नाची गोष्ट, चार दिवस प्रेमाचे अशी आणि कितीतरी नाटकं साहित्य संघामध्ये बघितली होती.

एकदा माझे आजोबा आले होते आमच्याकडे आणि आम्ही 'सख्खे शेजारी' ह्या नाटकाला जाणार होतो ....नाटक संध्याकाळी ७:३० च होतं. आजोबांना जेवण झालं की ढेकरांचा खूप त्रास व्हायचा म्हणून ते शतपावली करायचे आणि ढेकर आली की खूप मोठ्याने भा....त ..भा....त असं release होण्यासाठी जोरात ओरडायचे .....आमच्या चाळीत त्यांची ही सवय माहित झालेली होती ...त्यामुळे लोकांना माहीत होतं की त्यांना हा त्रास आहे. पण नाटकात इतर लोकांना त्रास होऊ नये म्हणून आईने आजोबांना संध्याकाळचं जेवण ४:३० लाच करून घेतलं आणि त्यांच्यासाठी thermos मध्ये coffee आणि आम्हांला fresh लोण्याचं sandwich करून घेतलं होतं. सुदैवाने आजोबांना नाटकामध्ये काही त्रास झाला नाही आणि आम्ही सगळ्यांनी मस्त enjoy केलं नाटक आणि खाऊ सुद्धा.

गिरगांवात नाटकाला जाणं हा एक सोहोळा असायचा, सगळे जण छान छान ठेवणीतल्या साड्या/कपडे गजरे, मंदसं अत्तर आणि नटून सजून यायचे, पुरुषही नेहेमीपेक्षा वेगळे ठेवणीतले कपडे, कुर्ता अशा वेशात असायचे. नाट्यगृहातली थंड हवा, हलकेच शिंपडलेलं गुलाबपाणी, सगळ्यांच्या अत्त्तरांचा mixed सुगंध, हळू आवाजातली कुजबूज, हलकेच हास्याचे आवाज, प्रेक्षागृहातले deemed lights, समोर dark maroon आणि भरगच्च सोनेरी काठ असलेला मखमली पडदा.... नाटकाच्या वेळेची पडद्यामागे वाजलेली घंटा, रंगदेवतेच्या पूजेच्या उदबत्तीचा सुंगंध .....आणि मग पडदा उघडण्याआधी खर्जातल्या आवाजातली नेहेमीची सूचना ....'रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून ......सादर करीत आहोत ...अमुक निर्मित तमुक प्रकाशित ३ अंकी नाटक....'

नाटकाचा पडदा उघण्याआधीच वातावरण निर्मिती झालेली असायची आणि काहीतरी छान बघायला मिळणार ह्याची खात्री असायची ....हे सगळं वातावरण इतकं हवंसं आणि सुसंस्कृत असायचं की आपण ह्याचा एक प्रेक्षक म्हणून भाग आहोत ह्याचही खूप अप्रूप वाटायचं आणि तेव्हाही आई-दादांनी आपल्याला किती चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं आहे त्याचा अभिमान वाटायचा.

आजही शिकागोमध्ये नाटकं आली आणि आम्हांला जमणार असेल तर आम्ही जरूर जातो ....पण ते गिरगांवात अनुभवलेलं नाटक आणि त्यावेळचं वातावरण हे काही केल्या परत अनुभवता येत नाही आणि मनातूनही जात नाही .........पण आताशा तर हे खुद्द गिरगांवातही अनुभवायला मिळत नाही असं मी ऐकलं आहे... पण आठवणींत साठवलेलं नाटक पुनःपुन्हा अनुभवायला स्थळ-काळाची गरजच नाहीये....

© कविता सराफ

७ मे २०२६