आई म्हणी आणि वाक्प्रचार
Blog post description.
7/29/20261 min read
आई म्हणी आणि वाक्प्रचार
आईकडे खूप मस्त म्हणींचा खजिना होता आणि तिच्या रोजच्या भाषेत त्या यायच्या आणि एकदम चपखल अर्थ पोहोचवाच्या. मराठी भाषा किती समृद्ध आहे ते त्यातून कळायचं. काही म्हणी इतक्या हसू आणायच्या की गंभीर प्रसंगात सुद्धा हास्याचे फवारे उठायचे. ह्या म्हणी खास विदर्भातल्या म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, तुमसर, चोपडा अशा विदर्भ आणि खान्देश कडच्या होत्या. मुंबई-पुणे भाषेतल्या म्हणी पण आमच्याकडे वापरल्या जायच्या पण त्या सगळ्यांना परिचित आहेत. त्यामुळे इथे आई वापरायची त्या शेलक्या म्हणीच ज्या मला अजूनही आठवतात त्याच दिल्या आहेत.
एकानी एकानी बाबा माझा दुकानी - खूप माणसं असलेल्या घरात जेव्हा सगळ्यांची जेवणं वेगवेगळ्या वेळेला होतात कोणाचाही वेळ एकमेकांबरोबर न जुळल्यामुळे
बाजारात तुरी, भट भटणीला मारी - अजून न मिळालेल्या यशाची वाटणी कशी करायची त्यावरून भांडण करणे
तू राणी मी राणी ढुंगण धुवायला पाणी कोण आणी ? - सगळेच जण स्वतःला शहाणे समजतात आणि काम करायला कोणी तयार नाही
शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड - खूप काम केल्यानंतर त्याची जाणीव ठेवण्यापेक्षा त्यातल्या बारीक चुका काढणे
चाकराला पडचाकर - एकाला सांगितलेलं काम त्याने/तिने अजून दुसऱ्याला सांगणे म्हणजे आजच्या भाषेत delegation of delegation
अडक्याचा सौदा आणि येरझारा चौदा - छोटीशी नगण्य गोष्ट साध्य करण्यासाठी केलेली अवाच्या सव्वा मेहनत
काम नाही कवडीभर आणि रिकामपण नाही घडीभर - काहीही काम साध्य न करता येणे पण ते करताना मात्र उगाचच वेळ घालवणे
कामाची कमळी हगायला तरमळली - काम सांगितलं की ते कसं टाळता येईल ते पाहणं
लाजून लाजून मेली आणि चावडीवर जाऊन मुतली - जे गुपित सांभाळायचं तेच शेवटी उघड करायला लागणे
ज्या घरची होशील बाळे त्या घरचे लागतील चाळे - लग्न होऊन सासरच्या सवयी आत्मसात करणारी
घरचिले देवा देवा बाहेरचीला चोळी शिवा - स्वतःच्या जबाबदाऱ्या सोडून लष्करच्या भाकऱ्या भाजणे (अजून एक म्हण)
तुला न मला घाल कुत्र्याला - कोणालाच काही मिळू न देण्याचा घाट घालणारे लोक
घोडं मेलं ओझ्याने आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने - क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे
आपलीच मोरी आणि सू करायची चोरी -आपल्याच हक्काच्या गोष्टींवरही आपला ताबा नसणे
एक हात लाकूड आणि नऊहात झिल्पी - कोणतीही गोष्ट असल्यापेक्षा जास्त मोठी करून सांगणे
सखू मरो बकू मरो डुबऱ्या माझ्या कामाचा - एक कोणीतरी असं असणं ज्याच्यावर सगळी भिस्त असणे
आपलं ठेवावं झाकून दुसऱ्याच पहावं वाकून - स्वतःची गुपित उघड न करता दुसऱ्याची बित्तमबातमी ठेवणे
आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट - आपलं ते सगळं बरोबर आणि दुसऱ्याचं सगळं निंदनीय
पादऱ्याला पावट्याचं निमित्त - मूळस्वभावाकडे जाण्यासाठी कुठल्याच बाह्य गोष्टींची आवश्यकता नसणे
दुसऱ्याच्या डोळ्यातलं कूस दिसतं पण स्वतःच्या पायाखालचं मुसळ दिसत नाही - दुसऱ्यांच्या चूका काढायच्या पण स्वतःच्या चुकांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष
न कर्त्याचा वार शनिवार - काहीच करण्याची इच्छा नसणाऱ्याला कुठल्याही कामासाठी मुहूर्त शोधावा लागतो
एकादशीच्या घरी शिवरात्र - कमतरतेमध्ये कमतरतेची वाढ
आधीच उल्हास त्यातून फाल्गुनमास - कोणत्याही कामाचा उत्साह नसणे आणि त्यावर करण्याची ईच्छा झाली तरी ती न करता येणे
सहन होईना आणि सांगता येईना - कोणत्याही गोष्टीची वाच्यता न करता येणे
घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं - आपलं काम संपत संपेना आणि दुसर्यांनी अजून काम वाढवणे
आगीतून फुफाट्यात - आधीच्या बिकट परिस्थितीपेक्षाहि अजून बिकट परिस्थितीत जाणे
नाकापेक्षा मोती जड - नथीतला मोती हे अध्याहृत आहे इथे. काहीतरी असंतुलित करणे
जेनू काम तेनू थाय बीजा करें सो गोता खाय - जे काम ज्याला चांगलं जमत ते त्यानेच करावं दुसऱ्याने केलं तर काहीतरी गडबडगुंडा
लवंगने उकाडा आणि वेलचीने थंडी - इतकी तोळामासा प्रकृती की कुठलाच छोटासा उपाय पण प्रकृती मध्ये बदल घडवून आणतो
30. रिकामा सुतार बायकोचे कुल्ले ताशी .....ह्या म्हणीचा अर्थ सांगायलाच नको.
अजून म्हणजे विदर्भातला आवडता शब्द म्हणजे 'भयताड'. माझी आई, आजोबा, मामा आणि मावश्या सगळे जण खूप वापरायचे. 'जा तिकडे भयताड कोणीकडची' हे तर मी लहानपणी कितीतरी वेळा ऐकलं आहे मस्ती करायचे म्हणून. विदर्भातल्या माणसांसारखीच त्यांची भाषाही अघळपघळ आणि गोड आहे. आणि त्यांच्या खाद्यसंस्कृतीवर तर मी लहानपणापासून फिदा आहे. गोळा-भात, वडा-भात, भजी-भात, विविध भाज्या - फळभाज्या आणि पालेभाजीच्या मुद्दा भाज्या किंवा पातळ भाज्या, वेगवेगळ्या चटण्या आणि कोशिंबिरी, आमटी, कढी, कुरडया, पापड्या, बाजरीच्या खारोड्या, बोरकुट ह्या सगळ्या पदार्थांची रेलचेल असायची आमच्याकडे. आपल्या आईच्या भाषा, खाद्यसंस्कृती, संस्कारांचा, वागणुकीचा, मूल्यांचा ठसा आपल्या सगळ्या घरावर असतो असं मला वाटतं आणि तसा तो माझ्यावरही खूप आहे.
© कविता सराफ
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
hello@kavitaskaleidoscope.com
New pieces published twice monthly
© 2026 Kavita's Kaleidoscope-Written and curated by Kavita.
Quiet Prose & Observations