आई, मी आणि ब्रॅण्ड्स

Blog post description.

AAI ANI MI

7/29/20261 min read

आई, मी आणि ब्रॅण्ड्स

माझ्या आईचा, तिच्या विचारपद्धतीचा, संस्कारांचा आणि एकूणच वागण्या-बोलण्यातल्या शिस्तीचा प्रभाव माझ्यावर आहे. दादांचा प्रभाव नाही असं नाही म्हणता येणार पण मी कुठल्याही द्विधा मनःस्थितीत सापडले की आईने काय केलं असतं असा विचार करून पुढे जाते आणि मला सापडलेलं उत्तर नेहेमीच योग्य असतं हे मला आतापर्यंत कळलं आहे. भाडीपाने आई आणि मी सिरीज आणली पण त्याही आधीपासून मी ह्या सिरीज चा विचार करत होते पण लिहायला जमत नव्हते...

आम्ही तिघी बहिणी आणि आई-दादा असं आमचं पंचकोनी कुटुंब गिरगावातल्या जगन्नाथ चाळीत राहायचो... माझं बालपण खूपच छान आणि सुंदर होतं हे मला आता जाणवतं आहे....आम्ही सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार ब्राह्मण कुटुंब होतो जिथे दादा सकाळी ७ ला construction company मध्ये जात आणि संध्याकाळी ७ नंतर येत असत त्यामुळे माझा खूप वेळ आईबरोबर आणि शाळेत जायचा. आई पण तिच्या लग्नाआधी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची पण मुंबईमध्ये लग्न झाल्यामुळे आईला नोकरी सोडावी लागली. पण आई जन्मभर शिक्षिका होती असं म्हटलं तरी चालेल. आमच्या गरज फार नव्हत्या आणि सुख-समाधान एकत्र असण्यातच होतं त्यामुळे आई-दादा थोड्या खर्चात पण जाणीवपूर्वक जे काही आमच्यासाठी करत ते छानचं आहे असाच आमचाही सूर असायचा आणि तो तेव्हाही आणि आजही योग्यच होता. तर आमच्या सुख-समाधानात एक गोष्ट नेहेमी असायची ती म्हणजे प्रत्येक सण गौड-धोड करून आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हायचा आणि आम्हाला प्रत्येक सणाला, वाढदिवसाला नवीन फ्रॉक-कपडे शिवले जायचे. इतक्या तुटपुंज्या पगारात आई कसं manage करायची ते तिच जाणे पण अगदी माझं लग्न होईपर्यंत हा आमचा रिवाज कधीही चुकला नाही. आई स्वतः पण छान शिवायची पण माझ्या जन्मानंतर तिला शिलाई मशीन चालवता यायची नाही त्यामुळे ती स्वतः फ्रॉक डिझाईन काढून आठले वहिनींना द्यायची आणि त्यांच्याकडून फ्रॉक शिवून घ्यायची.

तर आईचा विश्वास काही specific brands वर खूप गाढ होता आणि त्या-त्या खरेदीच्या वेळाही साधारण ठरलेल्या असायच्या ...जसं की घरातल्या चादरी-उशा अभ्रे अशा गोष्टी ती 'Co-Optex' नावाचा Cotton ब्रँड कडून किंवा 'लक्ष्मी-विष्णू' म्हणून एक ब्रँड होता त्यांच्याकडून घ्यायची बहुतेक दिवाळी च्या वेळेला, सगळ्यांचे टिकाऊ आणि अत्यावश्यक कपडे 'भारत store' मधून शाळा सुरु होण्याआधी, तिच्या रोजच्या घरात नेसण्याच्या साड्या नवरात्रीमध्ये 'मॉडर्न क्लोथ स्टोर' मधून, अंग पुसण्याचे मऊसूत पंचे, 'गिरगाव पंचे डेपो' मधून बहुतेक पावसाळ्याच्या आधी. देवाची वस्त्र 'माधवबागेतून' गुढीपाडव्याच्या वेळेला. दिवाळीच्या वेळी बरीच आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन लागायची त्यातूनही मग कधी कलकत्ता कॉटन, चंदेरी कॉटन, आसाम कॉटन अशी वेगवेगळी कापडं किंवा रेडिमेड ड्रेस असं काही-काही घेऊन यायची. ही तर नेहेमीची खरेदी पण 'खटाऊ' आणि 'गार्डन वरली' हे पण तिचे लाडके ब्रँड्स होते आणि त्याच्याही sober साड्या तिच्याकडे होत्या. आईने कधी भुलेश्वरला जाऊन खरेदी केली नाही कारण तिथे काहीच उपयुक्त आणि टिकाऊ मिळत नाही असं तिचं म्हणणं असायचं. पण दादर 'रानडे रोड' वरून मात्र तिला खरेदी करायला आवडायचं. तिच्या चपला पण ती 'Star Footware' म्हणून एक ठाकूरद्वार ला दुकान होतं तिथून घ्यायची किंवा मग 'Bata' च्या चपला.

हेच ब्रँड प्रेम किंवा त्यापेक्षाही 'गुणवत्तेचा' ध्यास तिला रोजच्या गोष्टींसाठी पण होता ... आमच्याकडे चहा पॉवडर 'हसमुखराय' कंपनीची असायची आणि ती २-३ महिन्यांनी तिथेच काही पोस्ट ऑफिस मध्ये काम असेल तेव्हा आणली जायची. मग येताना 'Bombay Farsan Mart' मधून ताजं फरसाण, उपास कचोरी, ढोकळे असं snack time साठी आणायची. हे फरसाण मार्ट आताच्या Food Vlog जमान्यात तर खूपच popular झालं असतं. किराणा माल 'सप्रे' विशेषतः साबुदाणा, वरी तांदूळ असे उपास पदार्थ आणि 'जनता वाणी' घराजवळच असल्यामुळे ठोक किराणा ह्या दुकानांमधून आणला जायचा. मसाल्याचे पदार्थ दादा नळ बाजारातून आईने दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन येत. रोजची भाजी म्हणजे फळभाज्या 'सदाशिव' गल्लीमधून आणि 'पालेभाज्या' वसईवाल्यांकडून असं तिचं ठरलेलं असें...संध्याकाळी छान चालून घरी येताना वाराप्रमाणे त्या-त्या देवळात जाऊन मग भाजी, गजरे घेऊन येणे असा काहीसा तिचा दिनक्रम असायचा ... पण तिचा सगळ्यात trusted brand म्हणजे 'Only Vimal'. आईचं हे विमल प्रेम आजू-बाजूच्यांना पण माहित होतं त्यामुळे मग ज्यांच्याकडे 'Reliance' चे stocks असायचे त्यांच्याकडे discount coupons असायची, ते तिला नेहेमी coupons आणून द्यायचे. मग आईबरोबर तिच्या लाडक्या 'La-Fans' ह्या काळा घोडाला असलेल्या विमल च्या showroom मध्ये आम्ही सगळे बसने जायचो. तिथे विमलचं maximum collection असायचं हे तिला नेहेमीच्या अनुभवामुळे माहित झालं होतं. दादांचे shirts-pants साठी कापड खरेदी, कधी आई साठी पण विमलची साडी आणि आमच्यासाठी ड्रेस ची कापडं अशी खरेदी व्हायची. मला आठवतं आहे की माईच्या लग्नाच्या वेळी, कारण ताईच्या लग्नाच्या वेळी मागोमाग माई पण लग्नाची होती त्यामुळे तेव्हा दादांसाठी suit शिवला नव्हता. पण माझ्या आणि माईच्या लग्नांमध्ये मध्ये बराच वेळ होता त्यामुळे दादांसाठी suit शिवायचा होता तेव्हाही आम्ही सगळे जण 'La-Fans' ला गेलो होतो .....दादांना एवढे पैसे खर्च करून suit घायला नको, नेहेमीसारखा shirt-pant घेऊ असा विचार होता पण आईने विमलचा आहे आणि coupons वर चांगला मिळाला आहे म्हणून तिथेच शिवूनही घेतला होता. कारण आईने आग्रह केला नसता तर दादांनी कधीच स्वतःसाठी suit घेतला नसता ... आणि माझ्या लग्नाआधीच दादा गेले त्यामुळे परत एकदा आईचा प्रत्येक निर्णय त्या त्या वेळी कसा योग्य होता हे आता मागे बघितल्यानंतर जाणवतं आहे. असो.... आईला ब्रँड आणि त्याच्यामागे येणारी गुणवत्ता, टिकाऊपणा आणि value for money हे सगळं खूप चांगल समजलं होतं असं वाटतं. 'La-Fans' हे खरं तर खूपच 'rich n elite' स्टोर होतं पण ते कधीही तिने आपण ह्या स्टोर मधून खरेदी करतो म्हणून मिरवलं नाही किंवा त्या दुकानाचा भपकाही तिने स्वतःला कधी जाणवू दिला नाही. ज्या आत्मीयतेने ती हिंदमाता, मॉडर्न क्लोथ स्टोर मधून खरेदी करायची त्याच आत्मीयतेने ती 'La-Fans' ला खरेदी करायची, तिथल्या लोकांशी बोलायची.

मी फार ब्रँड savvy नाहीये पण एकदाच दहावी झाल्यानंतर मी मला Titan चचं घड्याळ हवं म्हणून हट्ट केला होता आणि तो खूप छान मार्क्स मिळाल्यामुळे पुरवलाही गेला होता. स्वतः कमवायला लागेपर्यंत बाकी कशासाठी मी फार आग्रही नव्हते.....अगदी लग्न झाल्यानंतरही राहुल पण फार ब्रँड बघून खरेदी करणारा नाहीये त्यामुळे तेही पथ्यावरच होतं ... आता मात्र खूप वर्ष अमेरिकेत काढल्यामुळे किंवा आईचा प्रभाव असल्यामुळेही असेल पण काही काही ब्रॅण्ड्स मीही आता डोळे झाकून घेते, त्या-त्या वेळाही आईसारख्याच पाळते (जेव्हा शक्य असेल तेव्हा), online चा जमाना असताना जिथे स्वतः जाऊन खरेदी करण शक्य आहे तिथे स्वतः जाते आणि आपण पण Value for Money गुणवत्तेसाठी खर्चिला आहे ह्यात समाधान मानते आणि आईला आठवत रहाते ....

डिसेंबर २०, २०२५
© कविता सराफ