आई, मी आणि Migration

AAI ANI MI

7/29/20261 min read

आई, मी आणि Migration

स्थलांतर किंवा Migration हे किती पूर्वापार जगभर चालत आलं आहे. कधी दुसरा देश-प्रदेश पादाक्रांत करण्याची महत्वाकांक्षा असल्यामुळे, निव्वळ प्रवासासाठी, पोटापाण्यासाठी किंवा modern times मध्ये करिअरच्या चांगल्या संधी दुसऱ्या देश-प्रदेशात उपलब्ध असल्यामुळे किंवा अगदी कुटुंबामध्ये मुलगी परगावी लग्न करून गेली की ते ही एक स्थलांतरच आहे. प्रगतीसाठी किंवा स्थायीभाव झाल्याप्रमाणे स्थलांतर अविरत सुरुच राहिल. फक्त माणसंच नाही तर पक्षीही हवामानानुसार हजारो मैल प्रवास करून दुसऱ्या देश-प्रदेशात स्थलांतर करतात आणि नवनवीन अनुभवांना सामोरे जातात ....ह्याच 'Migration' नावाचा एक animated movie खूप छान आहे ...तो आम्ही आमच्या मुलींबरोबर बघितला होता...

आता देशांच्या सीमारेषा पुसट झाल्यामुळे, जग जवळ आल्यामुळे आणि सगळ्याच सुखसोयी दळण-वळण साधनं विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आपल्याला स्थलांतराचं आताशा काही विशेष अप्रूप राहिलं नाहीये. पण ५०-६० वर्षांपूर्वी एखाद्या मध्यमवर्गीय घरात लग्न होऊन चोपडा, गोंदिया ह्या खान्देश-विदर्भ भागातून एक शाळेत शिक्षिका असलेली मुलगी तेव्हा मुंबईत येते , स्वतःला ह्या शहराचा एक भाग बनवते, नवीन गोष्टी घेताना आपली मूल्य विसरत नाही आणि डोळसपणे आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीचा आलेख रेखाटते हे नक्कीच कौतुकास्पद होतं. हे माझ्या आईचं, माझ्या आदर्शाचं वर्णन आहे. त्याबद्दल तिला कधीही कोणी शाबासकी दिली असेल असं मला वाटत नाही पण म्हणूनच त्याची जाणीव ठेवून आपल्याला काय वारसा मिळाला आहे ते कळणं आणि ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ह्यासाठी हा लेखनप्रपंच.

माझी आई ८ बहिणींमधली एक आणि शेवटचा भाऊ आणि आई-वडील अशा देशमुख कुटुंबातुन होती. आजोबा वकील होते आणि त्यांच्याकडे खूप पक्षकारांचा राबता असायचा, जमीन-जुमला केसेस मध्ये आजोबा माहीर होते आणि गरीब कुटुंबाना न्याय मिळवून देण्यासाठी ते झटायचे. माझ्या आजीचं माहेर मंगळमूर्ती खूप श्रीमंत आणि उच्चविद्याविभूषित होतं ....तिचे आजोबा नागपूर युनिव्हर्सिटीचे Vice-Chancellor होते, माझी आजी लहानपणी मोटरने शाळेत जायची. ती खूप लाडात वाढली होती आणि आजोबांशी लग्न होऊन ती नागपूरहून गोंदिया मध्ये आली होती. आईला शिकण्याची खूप आवड होती पण तिला college शिक्षण देण्यापेक्षा मुलगा एकुलता एक असल्याने त्याच्या medical college ची fee भरणं जास्त महत्वाचं होतं हे आजोबांनी ठरवलं आणि आईने D.Ed. करून चोपड्याला शिक्षिकेची नोकरी केली.

पुढे लग्न झाल्यानंतर आई मुंबईला आली. लग्नानंतर पाठोपाठ २ मुली झाल्यामुळे शिक्षिकेच्या नोकरीचं पुढे काही झालं नाही. दादा सकाळी ७ ला डबा घेऊन भाईंदर/घाटकोपर अशा ठिकाणी HCC च्या ऑफिसला जायचे. पण आईने मुलींची शिक्षणं, अभ्यास, पालक सभा, आजारपणं, घर सांभाळणं, बाहेरची कामं - पोस्ट, बँक, ईन्शुरन्स, वर्षाकाठी गोंदिया-नागपूर-शेगांवला जाण्यासाठी रेल्वे बुकिंग करणं ( मला आठवतं आहे आईला CST डिजिटायझेशन झाल्यानंतर token based random window allocation होऊन ticket booking खूप efficient झालं होतं त्याचा तिला खूप आनंद झाला होता आणि ते तिने सगळ्यांना आमच्या चाळीत सांगितलं होतं...तोपर्यंत ते कुणाला माहितही नव्हतं), मुलींना वेगवेगळ्या सणांना stylish फ्रॉक शिवण असं सगळं न थकता केलं आहे. एकूणच नव्या गोष्टी शिकणं आणि त्या appreciate करणं तिच्या स्वभावातच होतं.

गिरगावात घर असल्याने आमच्याकडे पाहुण्यांचा राबता पण खूप असायचा कारण इथून सगळंच जवळ होतं म्हणजे high-court, विविध companies ची head-quarters, वेगवेगळी नामांकित hospitals आणि बराच काही. त्यामुळे बहुतेक, नातेवाईकांना जेव्हा गरज असेल तेव्हा ते पत्र टाकून आधी कळवूंन येत असत आणि आमच्याकडे २-३ किंवा कधी-कधी ८ दिवस मुक्कामालाही येत असत.....तेव्हा पाहुणे येऊन राहणं हे आत्तासारखं दुर्मिळ झालं नव्हतं. पण एवढ सगळं करूनही आई आणि दादा नेहेमी हसतमुख आणि दुसऱ्यांना मदत करायला नेहेमी पुढे असायचे. आईची जडण-घडण तिच्या दादांच्या विचाराने प्रभावित होती आणि त्यांचं नेहेमीचं वाक्य म्हणजे त्यांची जीवनशैली, 'स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यांसाठी जगलास तरच जगलास' अशी होती. आपल्या स्थलांतराचा, मुंबईसारख्या मध्यवर्ती राहण्याचा कोणाला फायदा योग्य कारणांसाठी होणार असेल तर तो जरूर व्हावा असं आई-दादा दोघांनाही वाटत असे.

गिरगांव हे अत्यंत सुसंस्कृत, शालीन आणि कलात्मक होतं....तिथे विविध व्याख्यानमाला - उद्यान, टोपीवाला, वसंत, शारदीय नवरात्र आणि पितृ पंधरवड्यात होणारी व्याख्यानं, गणपती उत्सवातली प्रवचनं, आमच्या चाळीतली गणेशोत्सवातली नाटकं, त्याच्या तालिमी, चक्री कीर्तने, राष्ट्रीय कीर्तनकारांची कीर्तन रत्नावली, चतुरंग प्रतिष्ठानचे एक कलाकार एक संध्याकाळ, सायंकाळी एक रांगोळी, चिन्मय मिशनचे, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे, साहित्य संघाचे कार्यक्रम असं बरच काही सतत चालू असायचे आणि आई-दादांचा सगळे व्याप सांभाळून ह्या सगळ्यात सहभाग असायचा आणि आम्हालाही ते चांगलं ऐकायला-बघायला घेऊन जायचे. त्यामुळे लहानपणापासून सकस ऐकून कान इतके छान तयार झाले आहेत की अजूनही चांगलं कसं ऐकावं, दिलखुलास दाद कशी द्यायची आणि जे आत्मसात करता येईल ते कसं करावं ह्यासाठी काहीच कष्ट घ्यावे लागत नाहीत ....कारण आम्ही हे सगळं लहानपणी आई-दादांकडून प्रत्यक्ष अनुभवलं आहे. ह्याचा दाखला म्हणजे ताईने चिन्मय मिशनच्या 'श्रवणसाधनेने मला काय दिले?' ह्या विषयावर निबंध लिहिला होता आणि त्याला तिला मुंबई विभागातून प्रथम पारितोषिक मिळालं होतं ....ह्यात तिच्या लेखनाचा जितका सहभाग होता तेवढाच आई -दादांनी तिला केलेल्या मार्गदर्शनातही होता. श्रवणभक्ती करताना, आईचा माईला practical advice असायचा की तुला मराठी शॉर्टहँड येतं तर ह्या व्याख्यानांचे मुख्य मुद्दे शॉर्टहँड मध्ये घे, म्हणजे शॉर्टहँडची आणि मुद्दे काढण्याची दुहेरी प्रॅक्टिस. तसंच कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करावा हे आई शिक्षिका असल्यामुळे खूप छान सांगायची, मी तर कठीण गोष्टींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी आईने सांगितलेल्या mnemonic चा उपयोग करायचे.

आता जेव्हा मी ह्या सगळ्याचा आता मागे वळून बघताना विचार करते तेव्हा मला जाणवलं आहे की मला आणि माझ्या बहिणींना किती सुयोग्य संस्कार मिळाले आहेत आई-दादांकडून आणि आईने हे सगळं transition किती सहज आत्मसात केलं होतं आणि तिच्या मूल्यांना तिने आधुनिकतेची जोड देऊन Best of both the worlds स्वीकारलं होतं.

मी जेव्हा स्थलांतर लग्नामुळे सुरवातीला ठाण्याला आणि आता इथे शिकागोला केलं तेव्हा आईने जितक्या सहजतेने मुंबईला केलं होतं कदाचित त्याच सहजतेने केलं .... त्याला फक्त आवश्यक त्या परिस्थिती आणि वातावरणाची गरज होती आणि theory of extrapolation प्रमाणे त्याची intensity जरी तीव्र होती तरी त्यासाठीची baseline आधीच आईने सेट करून ठेवली होती त्यामुळे आपल्याला ह्यापेक्षा काहीतरी अधिक करायची जबाबदारी आहे ही मानसिक तयारी कुठेतरी आधीच झिरपलेली होती ....आपल्याला मिळालेल्या संस्कार वारशाचं जतन आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या होतं राहावं आणि प्रत्येक नवीन पिढीने आधीच्या पिढीपेक्षा प्रगती करावी आणि आपल्या मूल्यांमध्ये स्थळ-काळानुसार वाढ करावी ह्यापेक्षा स्थलांतराची काही वेगळी व्याख्या असेल असं वाटत नाही.

© कविता सराफ

२८ मे २०२६